तीन दिवसात अचानक वाढली अतिक्रमणे: शेवगाव रोडवर तीन तास रास्ता रोको

29

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

पाथर्डी शहराच्या नगर व शेवगाव रोड लगत गेल्या तीन दिवसात झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून ही अतिक्रमणे काढा, या मागणीसाठी गुरूवारी काही मालमत्ताधारकांनी शेवगाव रोडवर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तर या विषयावर आणखी आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नगरहून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला आहे. आज गुरवार सायंकाळ पर्यंत ही अतिक्रमणे काढू, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलन चालू असताना नागरिकांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या बाबद अधिक माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी नगर रोड लगत असलेल्या न्यायालयाच्या भिंतीलगत रात्रीतून काही जणांनी अतिक्रमण करत जवळपास तेरा पत्र्याच्या टपऱ्या टाकल्या. दुसऱ्या दिवशी सायंकाळी शेकडो नागरिक जमा झाले व त्यांनी न्यायालयाच्या लगत असलेल्या पं..स.कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कंपाउंड समोरच अतिक्रमण करण्यास सुरवात केली. या नंतर काल रात्री शेवगाव रोड लगत असलेल्या जागेवर शेवगाव तालुक्यातील आलेल्या शेकडो आदिवासी महिलांनी मिळेल त्या जागेवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली. या रोड लगत जुना साकेगाव रास्ता असून तीस फूट रुंद व चार कि.मी. लांब असलेल्या या रस्त्याचा वाद हा न्यायप्रविष्ठ आहे तर रस्त्याच्या पलीकडे अनेकांचे प्लॉट व जमिनी आहेत. काल रात्री पासून या ठिकाणचे मालमत्ताधारक व अतिक्रमण करणारे यांच्यात वाद होत होते.

काही मालमत्ताधारकांनी ही अतिक्रमणे हटवावे या साठी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली तर काही जण पोलीस स्टेशनला सुद्धा गेले. हा विषय आपल्या अखत्यारीत नाही असे सांगून पोलिसांनी हात झटकले. या नंतर आज सकाळी गांधी हॉस्पिटल समोर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरवात केली. आंदोलनात नगराध्यक्ष डॉ. मृत्युन्जय गर्जे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, भाजपचे जेष्ठ नेते अशोक गर्जे, नगरसेवक नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, मनसेचे संतोष जिरेसाळ, सुभाष घोरपडे, प्रतीक खेडकर, राजेंद्र एडके, जमीर आतार, पार्वती थोरात आदी नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी आल्यानंतर दिनकर पालवे यांनी तहसील कार्यालया लगत असलेली अतिक्रमणे का काढत नाही, असा प्रश्न रत्नपारखी यांना केल्या नंतर रत्नपारखी यांनी न्यायालयाच्या भिंती लगत वकिलांनीच अतिक्रमणे केली आहेत ती आधी काढा, असे उत्तर दिले. तर या नंतर शेवगाव रोड लगत असलेली अतिक्रमणे काढल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील हे आंदोलनस्थळी आले व त्यांनी सायंकाळ पर्यंत अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान शेवगाव रोड लगत ज्यांनी अतिक्रमणे केली त्या अतिक्रमण धारकांना पालिका व पं. स. मधील काही पदाधिकाऱ्यांनी आणले असल्याची चर्चा असून आंदोलन संपल्यानंतरही आंदोलक व अतिक्रमण धारक यांच्यात वाद होऊ लागल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत नागरिकांना हटवले.

आपली प्रतिक्रिया द्या