
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ओडिशा येथील विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला शुक्रवारी सीबीआयने अटक केली. मनी लॉण्डरिंगचे प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच घेताना ईडीचा उपसंचालक चिंतन रघुवंशीला रंगेहाथ पकडण्यात आले. तब्बल 2 कोटींचे हे डील ठरले होते.
मनी लॉण्डरिंगची केस सेटल करण्यासाठी उद्योजकाशी दोन कोटींचे डील
लाचखोर रघुवंशीने मनी लॉण्डरिंग गुह्यात भुवनेश्वरमधील खदान व्यावसायिकाचे नाव वगळण्यासाठी त्याच्याकडून 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेच्या रकमेपैकी 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना रघुवंशी सीबीआयच्या जाळय़ात सापडला. ईडीच्या कार्यालयातच सापळा रचून लाचखोर उपसंचालक रघुवंशीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम जप्त केली असून या लाचखोरीमध्ये ईडीच्या आणखी अधिकाऱयांचा सहभाग असण्याच्या शक्यतेने सीबीआयकडून कसून तपास केला जात आहे. खदान व्यावसायिक रतिकांता रौतच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून ही कारवाई केल्याची माहिती सीबीआयने दिली.
अटक टाळण्यासाठी मागितले पाच कोटी रुपये
ईडी उपसंचालक रघुवंशीने मार्च मह़िन्यात तक्रारदार रौत यांना समन्स बजावले होते. त्यावेळी त्याने केबिनमध्ये बसून प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी बोलणी सुरू केली होती. अटक टाळण्यासाठी तसेच हॉस्पिटल जप्त न करण्यासाठी पाच कोटी रुपये मागितले होते. एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे रौत यांनी सांगितल्यानंतर रघुवंशीने दोन कोटी रुपयांची मांडवली केली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये घेताना रघुवंशीला सीबीआयकडून अटक करण्यात आली.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
लाचखोर रघुवंशीला अटक केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयने त्याला कोठडी देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने रघुवंशीला 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली.