बाणा सोडणार नाही! इंग्लिश संघाचा प्रशिक्षक मॅकलमचे स्पष्ट संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅझबॉल अर्थातच आक्रमक बाण्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजीचा चेहरामोहराच बदलून टाकल्याचे अवघ्या जगाने पाहिलेय. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेचा निकाल काहीही असो, आम्ही आमचा बाणा सोडणार नसल्याचे प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमने आताच स्पष्ट केले आहे.

येत्या 25 जानेवारीपासून हैदराबाद, विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धर्मशाळा येथे इंग्लंडविरुद्धचे पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या साऱया खेळपट्टय़ा फिरकीला पोषकच असणार याची आम्हाला कल्पना असल्याचेही मॅकलमने सांगितले.

आगामी मालिकेत हिंदुस्थानविरुद्ध त्यांच्याच भूमीवर खेळणे आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक असणार याची कल्पना आहे. निश्चितच हिंदुस्थान आमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि हेच आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल. जर आम्ही आमच्या खेळात यशस्वी ठरलो तर हे सारे नक्कीच अफलातून असेल, पण  दुर्दैवाने अपयशी ठरलो तरी आम्ही आमचा आक्रमक बाणा सोडणार नाही. आमचं खेळावर प्रेम आहे आणि या खेळाला जितके चांगले करू शकतो तितके करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही फार नशीबवान आहोत की, आमच्या बॅझबॉलला यश मिळतेय. त्यामुळे आमच्या या खेळाला कोणतीही सीमा नसल्याचेही तो म्हणाला. आयपीएलच्या पहिल्या मोसमात 73 चेंडूंत केलेली 158 धावांची खेळीच बॅझबॉलची प्रेरणा असल्याचेही तो म्हणाला.

बॅझबॉल म्हणजे काय रे भाऊ…?

बॅझबॉलचा ‘बॅझ’ हा शब्द मॅकलमचे टोपणनाव बॅझ आणि त्याच्या आक्रमक रणनीतीच्या आधारे रचला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक शैलीत फलंदाजी करून आपल्या फलंदाजीला बळकटी देण्याचा प्रकार म्हणजे ‘बॅझबॉल’. इंग्लंड संघाने गेल्या दोन वर्षांत या शैलीत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत कसोटी क्रिकेटला आणखी रंगतदार केले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या बॅझबॉलची अवघ्या क्रिकेटविश्वात दहशत पसरली आहे.