
मराठी माणूस हा नाटय़प्रेमी आहे. अशाच काही नाटकवेडय़ा मित्रांनी एकत्र येऊन स्वतःचे पैसे खर्चून नाटय़मंच हा मराठी नाटकांसाठीचा ओटीटी प्लॅटफॉर्म उभारला आहे. सिनेमांसाठी, वेबसीरिजसाठी जसे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, त्याच धर्तीवर जुनी, अभिजात मराठी नाटके रसिकांना घरबसल्या बघता यावीत, या उद्देशाने ‘नाटय़मंच’ची निर्मिती करण्यात आली आहे. या मंचावर अल्प दरात मराठी नाटकांचा आनंद घेता येईल.
लॉकडाऊन लागले आणि घरबसल्या मनोरंजनासाठी लोक मोठय़ा प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. पण नाटय़मंच सुरू करण्याच्या हालचाली त्याआधीपासून म्हणजे 2019 पासून सुरू झाल्या होत्या. सिनेमा आणि वेबसीरिजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म होते. मात्र थिएटरसाठी ओटीटी नव्हते. रसिकांना दर्जेदार मराठी नाटके बघता यावीत, अगदी घरी बसून थिएटरचा ‘फिल’ घेता यावा, म्हणून ‘नाटय़मंच’ची निर्मिती करण्याचा विचार पुढे आला. 2019 मध्ये या संकल्पनेवर काम सुरू झाले. लेखक शोधले गेले, नाटकांचे प्रोडक्शन आणि शूटिंगच्या दृष्टीने चर्चा झाल्या. पहिल्या लॉकडाऊनमध्ये निर्बंध शिथिल झाल्यावर चेतन दातार यांचे ‘हॅलो इन्स्पेक्टर’ हे पहिले नाटक ‘नाटय़मंच’वर आले. त्यानंतर ‘लपंडाव’ नाटक आले. अतिशय उच्च तंत्रज्ञान आणि अनेक कॅमेरे आणि लाईव्ह लोकेशनवर शूटिंग ही नाटय़मंचच्या नाटकांची वैशिष्टय़े आहेत. संस्थापक उज्ज्वला खेर, लीना एस. के. सहसंस्थापक प्रवीण साळवी, आशिष कांबळी, आशय कांबळी, अनिकेत बोले अशी ‘नाटय़मंच’ची टीम आहे.
- जुलैपासून अॅण्ड्रॉइडवर ‘नाटय़मंच’ अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपवर ‘प्रिझम’ची 25 नाटके विनामूल्य बघता येतात. ‘नाटय़मंच’ची निर्मिती असलेली चार नाटके अपलोड झालेली आहेत. गणेशात्सवात रत्नाकर मतकरी लिखित ‘साटंलोटं’ हे पाचवं नाटक अपलोड होणार आहे. विजय पेंकरे यांनी ही नाटके दिग्दर्शित केली आहेत. प्रत्येक नाटकामागे 50 रुपये शुल्क आहे.
- येत्या काळात गुजराती, बंगाली हिंदी आणि इंग्लिश नाटके उपलब्ध करून देण्याचा ‘नाटय़मंच’चा विचार आहे.




























































