
सामना प्रतिनिधी । नगर
जगातील लोक हे पर्यावरणामुळे अस्वस्थ आहेत. पर्यावरणाचे शोषण होत आहे. कुठल्याही गोष्टीची शाश्वती राहिलेली नाही. शोषणामुळे प्रदुषण वाढले आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेंद्रिय शेती नजरेआड झाली असून रासायानिक खतांच्या असंतुलित व अतिवापरामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे. त्यामुळे विषमुक्त अन्न मानवाच्या शरीरात स्लो पॉयझनचे काम करीत आहे. कृषी व पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
आत्मा अहमदनगर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मित्रांसाठी रासायनिक खत साक्षरता अभियान जिल्हास्तरीय प्रशिक्षणप्रसंगी हजारे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. एन. के. भुते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना हजारे म्हणाले की, पर्यावरणाचा भक्कम करायचं असेल, तर कृषी क्षेत्राला बळकट करावं लागणार आहेर. कृषी पर्यावरणाचा भाग आहे. कृषीची शक्ती वाढली पाहिजे. शेतकर्यांनी जागृत व्हायला हवे. जमिनीचे आरोग्य सुधारवायचं असेल, तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार सेंद्रिय शेती करावी. स्वतःही विषमुक्त अन्न खा व ग्राहकांनाही विषमुक्त अन्न द्या. गावरान गायींचे संवर्धन करा. पैसा हे जीवनाचं ध्येय नाही. ईश्वराने मनुष्य जन्म दिला आहे. तो पैशासाठी नाही. पैसा हा जीवन चरितार्थाचे साधन आहे. जीवनात थोडासा त्याग केल्याशिवाय प्रगती होत नाही, असे ते म्हणाले.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्हाटे म्हणाले की, शेतकर्यांमध्ये खत साक्षरता व्हायला हवी. प्रत्येक शेतकर्याने जमीन आरोग्य पत्रिका काढून त्यानुसार शेती करावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी कृषीच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी खत साक्षरता या विषयावर, तर डॉ. एन. के. भुते यांनी गुलाबी बोंडअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी केले. आभार देवेंद्र जाधव यांनी मानले. राळेगण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.


































































