
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
वृक्षतोड, लाकूडफाटा, गोवऱ्या आदी न जाळता गाव स्वच्छ करुन जमा झालेल्या केरकचऱ्याची होळी करुन पंढरपूर तालुक्यातील घालमे-पवार वस्ती येथील शिक्षक आणि आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक होळी साजरी केली. जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रशांत वाघमारे हे अशा प्रकारची अनोखी होळी गेल्या 24 वर्षांपासून करतात.
होळीचा सण म्हटलं की, बेसुमार वृक्ष तोड, गोवऱ्या आदी साहित्य जाळण्याची परंपरा आहे. मात्र या अशा होळी मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे वाघमारे सरांनी सर्वांना पटवून दिले आणि होळीच्या दिवशी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी स्वच्छतेच्या कामाला जुंपले. संपूर्ण गाव झाडून चकाचक करुन जमा झालेल्या कचऱ्याची होळी करण्याची अनोखी प्रथा सुरु केली.
त्यांच्या या होळीला उदंड प्रतिसाद मिळत असून गेली 24 वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडित सुरु आहे.































































