वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सची विजयी सुरुवात, यजमान जर्मनीचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सने मंगळवारी रात्री झालेल्या लढतीत बलाढय़ जर्मनीला 1-0 अशा फरकाने पराभूत करीत युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील एफ गटात विजयी सलामी दिली. जर्मनीचा बचावपटू मॅट्स हमेल्सकडून गोलजाळ्याजवळ चूक घडली आणि याचा फटका यजमान संघाला बसला. 20व्या मिनिटाला मॅट्स हमेल्सकडून ओन गोल झाला. या गोलच्या जोरावर फ्रान्सला 1-0 अशी आघाडी घेता आली. आता एफ गटात फ्रान्सचा संघ तीन गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. पोर्तुगालने हंगेरीवर 3-0 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत या गटात पहिले स्थान पटकावले आहे.

पोग्बा, एमबाप्पे सरस

फ्रान्सला जर्मनीविरुद्धच्या लढतीत मोठे यश संपादन करता आले नाही. पण पॉल पोग्बा, किलियन एमबाप्पे या दोन खेळाडूंनी या लढतीत छान कामगिरी केली.

पॉल पोग्बाने मिडफिल्डमध्ये जर्मनीसमोर आव्हान उभे केले. किलियन एमबाप्पे याने गोल करण्यासाठी प्रयत्न केले. करीम बेन्झेमा व किलियन एमबाप्पे यांनी तर प्रत्येकी एक वेळा फुटबॉल गोलजाळ्यातही ढकलला होता. पण पंचांकडून या दोन्ही वेळेला ऑफसाईड घोषित करण्यात आले.

फ्रान्स-जर्मनी लढतीची आकडेवारी

फ्रान्स जर्मनी

  • गोल 1 0
  • शॉट 4 10
  • शॉट ऑन टार्गेट 1 1
  • बॉलवरील ताबा 41 59
  • ऑफसाईड 4 2
  • कॉर्नर्स 3 5
  • यलो कार्ड 0 1
  • रेड कार्ड 0 0

मागील 17 लढतींमध्ये पराभवाविना

फ्रान्सने जर्मनीविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत तीन आक्रमक फळीतील खेळाडूंना मैदानात उतरवले. किलियन एमबाप्पे, अँटोईन ग्रिझमन व करीम बेन्झेमा या तीन फॉरवर्डसह लढत खेळणाऱया फ्रान्सला या लढतीत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. फुटबॉलवरील ताबाही जर्मनीच्या खेळाडूंकडे अधिक होता. पण फ्रान्सच्या बचावपटूंनी जर्मनीच्या आक्रमक फळीतील फुटबॉलपटूंना गोल करू दिला नाही हे विशेष. फ्रान्सने आपली विजयी मालिका कायम ठेवली. या संघाने मागील 17 लढतींमध्ये पराभवाचा चेहरा पाहिलेला नाहीए.