
सामना प्रतिनिधी । कराड
आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत. राष्ट्राची, राज्याची व जिल्ह्याची प्रगती करायची असेल तर महायुतीचे उमेदवारांना निवडून द्या. हितचिंतक बनून न राहता सक्रीय कार्यकर्ता बनून महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
कराड तालुक्यातील कोरेगाव, सयापूर, टेंभू, ओगलेवाडी, करवडी, वाघेरी, शामगाव, वडोली निळेश्वर, शिरवडे, वडोली भिकेश्वर, वाघेश्वर, किवळ या गावात सातारा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेटी व कोपरासभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, शेती उत्पन्न बाजारसमितेचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, मोहनराव जाधव, जिल्हा परीषद सदस्य मनोजदादा घोरपडे, जिल्हा परीषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर चरेगावकर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. संरक्षण, शेती, रोजगार, पाणी यासाठी केंद्र व राज्य सरकारने गेल्या 5 वर्षांत खूप मोठे काम केले आहे. काम पुढे सुरु ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. 1999 साली भाजप-शिवसेना सरकारला मतदारांनी दुसर्यांदा संधी न दिल्यामुळे केंद्रातील वाजपेयी सरकार तसेच राज्यातील मनोहर जोशी सरकारने सुरु केलेल्या योजना नंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने बंद केल्या. गेल्या 5 वर्षांत सुरु केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी 5 वर्षे लागणार आहेत. सुवर्णचतुष्कोन योजना अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरु केली होती. परंतु काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या नावाचे फलकही काढून टाकले. देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट गर्जत आहे. सातारा जिल्ह्यात भाजपला खासदार किंवा आमदार नसतानाही साडे अकरा हजार कोटींची विकासकामे केंद्र आणि राज्य सरकारने केली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुल्या व्यासपीठावर येउन त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या आणि आमच्या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची तुलना करावी.
शिवसेना माजी तालुका अध्यक्ष विनायक भोसले, माथाडी युनियनचे सदस्य दत्ता काळे, संजय पाटील, शिवाजी जाधव, सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिक, युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


































































