
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
बिटकॉइन खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी गुजरातमधील भाजपचे आमदार नलीन कोटाडिया याला रविवारी महाराष्ट्रातील धुळे जिह्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी कोटाडिया याला फरारी घोषित केले होते.
सुरत येथील बिल्डरकडून काही पोलीस अधिकाऱयांनी 9 कोटी रुपये मूल्याची बिटकॉइन ही डिजिटल करन्सी खंडणी म्हणून घेतल्याच्या प्रकरणात कोटाडियावर आरोप आहेत.
रविवारी नलीन कोटाडिया याला धुळेनजीक अमळनेर येथून अटक करण्यात आल्याची माहिती अहमदाबाद गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त दीपन भद्रन यांनी दिली. गुजरातमधील स्थानिक न्यायालयाने मे महिन्यात कोटाडियावर अटकवॉरंट जारी केले होते. बिटकॉइन खंडणी प्रकरणात अमरेली जिह्याचे पोलीस अधीक्षक जगदीश पटेल यांच्यासह 12 हून अधिक पोलीस अधिकाऱयांना आजवर अटक केली आहे.
बिटकॉइन खंडणी प्रकरण
सुरत येथील बिल्डर शैलेश भट आणि त्याचा व्यावसायिक भागीदार किरीट पलाडिया या दोघांचे अमरेलीतील पोलीस कर्मचाऱयांनी गांधीनगर येथून 9 फेब्रुवारी रोजी अपहरण केले. पोलिसांनी पलाडिया याच्या मालकीची 9 कोटी रुपयांची बिटकॉइन्स खंडणी म्हणून वसूल केली. पलाडिया याच्यावर एका पोलीस अधिकाऱयाने दबाव आणून बिटकॉइन ट्रान्सफर केल्याचे भट याने तक्रारीत म्हटले होते.
या संपूर्ण कटामागे माजी आमदार नलीन कोटाडिया याचा हात आहे असा भट याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागाने तपासणी करून जगदीश पटेल याच्यासह इतरांवर जुलै महिन्यात आरोपपत्र दाखल केले आहे.




























































