‘शारदाश्रम’मधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसगाड्या, बेस्ट प्रशासनाकडून शिवसेनेची मागणी मान्य

एलफिन्स्टन पूल बंद झाल्यापासून बेस्टच्या अनेक बसगाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याचा इतर प्रवाशांसह शाळकरी मुलांनाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने शिवसेनेने बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. शिवसेनेच्या मागणीला अनुसरून बसमार्ग क्र. 40 च्या मार्गावर इतर मार्गावरील अतिरिक्त बसगाडय़ा वळवण्यास बेस्ट प्रशासनाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शारदाश्रम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एलफिन्स्टन पुलावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. बसमार्ग ए-162, 168, 201 आदी बसमार्गांच्या प्रवर्तनात बदल करण्यात आला. त्यामुळे बसमार्ग क्र. 40 वरील प्रवासी भारमानात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने बसमार्ग क्र. 40 ची वारंवारता वाढवण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली होती. दादर विभागात असलेल्या शाळांमध्ये शिवडी येथून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एल्फिन्स्टन पूल सुरु असताना शारदाश्रम शाळेसाठी 201 क्रमांकाची बससेवा उपयुक्त ठरायची. पण एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने शारदाश्रमचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बसमार्ग क्र. 40 ने प्रवास करून दादर टीटी येथे उतरून त्या ठिकाणाहून दुसरी बस पकडून शाळेकडे जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी बसमार्ग क्र. 40 ची बससेवा वाढवावी आणि ही बस दादरला पोचल्यानंतर तेथून शारदाश्रम शाळेसाठी दुसरी बस लगेच उपलब्ध करावी, अशी मागणी पडवळ यांनी पत्राद्वारे केली होती. त्याला अनुसरून बेस्ट प्रशासनाने बसमार्ग क्र. 40च्या मार्गावर इतर बसमार्गावरील बसगाडय़ा वळवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुरेसा बसताफा उपलब्ध झाल्यानंतर बसमार्ग क्र. 40 च्या बसफेऱयांमध्ये वाढ करण्यास तयारी दर्शवली आहे.