
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. एफवायबीएच्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये एक-दोन विषयात शून्य गुण मिळाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या पेपरतपासणीवरच शंका उपस्थित केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी आयडॉलने एफवायबीएचा निकाल जाहीर केला. आयडॉलच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह असताना आता मुंबई विद्यापीठाने मोठय़ा प्रमाणावर एफवायबीएच्या विद्यार्थ्यांना नापास केले आहे. विद्यार्थ्यांना इतर विषयांत चांगले गुण असताना एक किंवा दोन विषयात शून्य, दोन गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पूर्नतपासणी घ्यावी. पुर्नतपासणीसाठी शुल्क आकारू नये, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केली आहे. कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे अन्यथा तीक्र आंदोलनाचा इशारा लॉ कौन्सिलने दिला आहे.
प्रथम वर्ष बीए या परीक्षेत एकूण 5090 विद्यार्थी बसले होते. सर्वच विषयात विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले नाहीत. जर विद्यार्थी निकालामध्ये असमाधानी असेल तर तो पुनर्मुल्यांकन व छायाप्रती साठी अर्ज करू शकतात, हे निकाल लवकर जाहीर करण्यात येतील.
विनोद माळाळे
जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ
213 विद्यार्थी – 1 विषयात शून्य गुण
18 विद्यार्थी – 2 विषयांत शून्य गुण
4 विद्यार्थी – 3 विषयांत शून्य गुण
1 विद्यार्थी – 4 विषयांत शून्य गुण



























































