आव्हानांना तोंड देत पूर्ण केली ‘समांतर 2’! दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सांगितला अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित असलेल्या एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या ‘समांतर’  या वेब सिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला.  नुकत्याच भेटीला आलेल्या ‘समातंर-2’लादेखील प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘समांतर-2’चे दिग्दर्शन करताना माझ्यासमोर अनेक आव्हाने होती. एकतर मी पहिल्यांदाच वेब सिरीजचे दिग्दर्शन करत होतो आणि  दुसरे म्हणजे कोरोना काळात शूटिंग करताना अनेक बंधने होती.  परंतु या सर्व आव्हानांवर मात करत  मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने समांतर-2  यशस्वीपणे पूर्ण केल्याचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सांगितले.

‘समांतर-2’मध्ये नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत तसेच सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेब सिरीजबद्दल बोलताना समीर विद्वांस म्हणाले, ‘समांतर’ ही नाटय़मय मालिका असून ती गूढता व रोमांचाने पुरेपूर भरलेली आहे. त्यामुळे ती रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या वेब मालिकेचा दुसरा सिझन आम्ही मुंबई, पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, भोर आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यामध्ये चित्रित केला आहे. त्यामुळे या मालिकेचा नैसर्गिक लूक कायम राहिला आहे. निर्माते  अर्जुन आणि कार्तिक यांचे आभार. या दोघांनी या मालिकेमध्ये सर्जनशीलपणे लक्ष घातले आणि दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही.