आता घरबसल्या करा वाहन परवान्याचे नूतनीकरण, सोलापुरात सुरू होणार फेसलेस सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवा वाहनधारकांना आता घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यांना घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सहज शक्य झाले आहे. आता लायसन्स रिन्यूअल, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्समधील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी, आरसी बुकवरील पत्ता बदल व एनओसीची कामेदेखील वाहनधारकांना फेसलेस सेवेच्या माध्यमातून घरबसल्या करता येणार असल्याची माहिती सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन विभागाकडून लायसन्स नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित अशा 115 सेवा दिल्या जातात. यातील 84 सेवा ऑनलाइन आहेत. यात अर्जदार ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन पेमेंट व कागदपत्रे अपलोड करू शकतो. परंतु, या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) येऊन मूळ नोंदणी प्रमाणपत्र व कागदपत्रे जमा करावी लागतात. मात्र, केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार 18 सेवा आधार क्रमांकाचा वापर करून नागरिकांना ‘फेसलेस’ पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिकाऊ अर्थात लर्निंग लायसन्स क कितरकांमार्फत नोंदणी अशा दोन सेका दिल्या जात आहेत. आता यात आणखीन सहा सेवांची भर पडली आहे. तसे आदेश परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. 1 जूनपासून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

फेसलेस सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडणे बंधनकारक आहे. parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करताना आधार क्रमांकामधील मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. या संकेतस्थळामध्ये नोंदणी केल्यास अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच अर्जदारास पुढे जाईल.

1 जूनपासून फेसलेस सेवेमध्ये एकूण सहा सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे अर्जदाराला कुठूनही अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होऊन, कामकाज अधिक पारदर्शक व वेगाने होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे या कामांमध्ये कोणत्याही एजटांची मदत घ्यावी लागणार नाही.

– अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.