
सामना प्रतिनिधी । मुंबई
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून बनावट सोने ज्वेलर्सला देऊन फसवणूक करणाऱयाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-10 ने मुसक्या आवळल्या असून जयेश जगदीश शेट्टी असे त्याचे नाव आहे. त्याच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
जयेश वसई परिसरात राहतो तो आणि त्याचा फरार साथीदार हे ज्वेलर्सच्या दुकानात जातात व तेथे मालकाचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर काही जण ज्वेलर्सच्या दुकानात येतात. सीबीआय अधिकाऱयाने फोन केलाय असे भासवून सोने गहाण ठेवण्याच्या नावाखाली बनावट सोने द्यायचे. अंधेरी येथील एका ज्वेलर्सची त्यांनी 1लाख 86 हजार रुपयाची फसवणूक केली होती. ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी नुकताच अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास कक्ष-10 चे अधिकारी करत होते. पोलीस निरीक्षक अरविंद घाग, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर मुदिराज, वाहिद पठाण, एएसआय धोंडीराम सावंत, पोलीस हवालदार गावंडे यांनी सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी जयेशला वसईतून ताब्यात घेतले.



























































