वांद्रय़ाच्या सरकारी वसाहतीत कुटुंबाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

वांद्रे येथील सहकारी वसाहतीत राहणाऱ्या राजेश भिंगारे (५०) यांच्यासह त्यांची पत्नी अश्विनी (४०), मुलगा तुषार (२३) आणि गौरव (१९) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सरकारी नोकरीत शिपाई या पदावर कार्यरत असलेले भिंगारे सरकारी वसाहतीतील इमारत क्र. २ मध्ये अनेक वर्षांपासून राहत होते. सर्वांशी मिळून मिसळून असलेल्या भिंगारे कुटुंबीयांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे रहिवाशी हळहळ व्यक्त करीत होते. आर्थिक चणचण आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे राजेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

राज्य सरकारच्या रेशनिंग विभागात शिपाई पदावर रुजू झालेले राजेश भिंगारे हे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात कार्यरत होते. शुक्रवारी रात्री त्यांनी ९.३० च्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत जेवण केले होते. त्यांच्या घरी घरघंटी असल्याने दळणाचा ठेवलेला डबा आणण्यासाठी सकाळी ९ वाजता दुसऱ्या मजल्यावरील महिला त्यांच्या घरी गेली होती; मात्र दरवाजा बंद असल्याने त्या माघारी गेली. त्यानंतर ११ वाजता पुन्हा आल्यानंतरही दरवाजा बंदच असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी दरवाजा उघडून पाहिले असता चारही जणांचे मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी तत्काळ त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते.

गणेशोत्सव मंडळाच्या पूजा समितीचे अध्यक्ष

राजेश भिंगारे हे सर्वच सामाजिक उपक्रमांत हिरीरीने भाग घेत. सरकारी वसाहतीतील ‘खेरवाडीचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजा समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. सर्वांना सोबत घेऊन सार्वजनिक उपक्रम पार पाडणारा असा पूजा समिती अध्यक्ष आता आम्हाला मिळणार नाही, अशी खंत मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कदम यांनी व्यक्त केली.

मुलाला परदेशात पाठवण्याचे स्वप्न अर्धवट

तुषार या मोठ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी नुकतीच घेतली होती. त्यामुळे त्याला परदेशात नोकरीला पाठवायचे असे स्वप्न उराशी बाळगूनच राजेश यांनी मुलाचा पासपोर्ट काढला होता; मात्र त्यांचे स्वप्न अर्धवट राहिल्याचे रहिवाशांनी सांगितले. तर गौरव हा मुलगा १२वीमध्ये शिकत होता.