घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासात अटक, फरासखाना पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहिणीकडे राहण्यास गेलेल्या महिलेचे कसबा पेठेतील बंद घराचे कुलूप तोडून 3 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केले. त्याच्याकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जयवंत ऊर्फ जयड्या गोविंद गायकवाड (रा.आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुलीसोबत कसबा पेठेत राहायला आहेत. कामानिमित्त 20 सप्टेंबरला महिला मुलीसह कात्रज येथे त्यांच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 25 तारखेला मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 3 लाख 25 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

याप्रकरणी फरासखाना पोलिस गुन्ह्याचा तपास करत असताना सराईत गुन्हेगार जयवंत गायकवाडने गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जयवंतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 3 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, सयाजी चव्हाण, बापू खुटवड, अभिनय चौधरी, मोहन दळवी, सचिन सरपाले, ऋषीकेश दिघे, पंकज देशमुख, गणेश आटोळे यांच्या पथकाने केली.