भाजपच्या खोट्या जाहिरातीचा शेतकऱ्यानेच केला पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीआधी ‘बहुत हुआ किसान पर अत्याचार, अबकी बार मोदी सरकार’, ‘बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरातबाजी करणाऱया भाजपचा खोटारडेपणा एका शेतकऱयाने उघडकीस आणला. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी भाजपने ठिकठिकाणी पोस्टर लावले असून या पोस्टरवर ज्या शेतकऱयाचा फोटो वापरला तो शेतकऱयाला न विचारताच लावला आहे. शेतकऱयाच्या सजगतेमुळे भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.

राजस्थानमध्ये या वर्षीच्या अखेरपर्यंत विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी राजस्थानमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात ‘नहीं सहेगा राजस्थान’ ही मोहीम सुरू केली आहे. भाजपने पोस्टर जारी केले असून पोस्टरवर लिहिले, राजस्थानात 19 हजारांहून अधिक शेतकऱयांच्या जमिनीचा लिलाव झाला. परंतु आता हे सहन करणार नाही. या पोस्टरवर ज्या शेतकऱयाचा फोटो लावला होता. तो शेतकरी पुढे आला असून माझ्या परवानगीविना भाजपने फोटो वापरलाय, असे शेतकऱयाने म्हटले आहे. या शेतकऱयाचे नाव माधुराम जयपाल आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. तसेच त्यांच्या जमिनीचा लिलावही झाला नाही. तरीही त्यांचा फोटो भाजपने पोस्टरवर वापरला.

जैसलमेरच्या रामदेवरा गावच्या ढाणीत राहणारे 70 वर्षीय माधुराम जयपाल यांच्या म्हणण्यानुसार, भाजपने जे पोस्टर लावले त्यात माझा फोटो वापरला आहे. जयपूरमध्ये लावण्यात आलेले पोस्टर पाहून गावातील एका तरुणाने पोस्टरचा फोटो गावातील व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये पाठवला. भाजपने माझा फोटो मला न विचारता वापरला आहे. भाजपने हा फोटो तत्काळ हटवला पाहिजे. जर माझ्या जमिनीचा लिलाव झाला असता किंवा माझ्यावर कर्ज असते तर ते मला कळले असते. माझ्यावर कर्ज असते तर सरकारने कर्जमाफी केली असती. मी भाजपवाल्यांना ओळखत नाही. मी कोणतेही कर्ज घेतले नाही. मला न विचारता माझा फोटो का छापला हेच मला कळत नाही, असे शेतकऱयाने म्हटले आहे.

भाजपमुळे कुटुंबाची होतेय बदनामी

माधुरामला तीन मुले आहेत. जेव्हापासून भाजपने पोस्टरवर माधुरामचा फोटो छापला आहे तेव्हापासून कुटुंबाची बदनामी होत आहे, असे माधुरामच्या मुलाने सांगितले. भाजपने तत्काळ हा फोटो पोस्टरवरून हटवायला हवा, अशी मागणी माधुरामच्या मुलाने केली आहे. भाजपने पोस्टरवरून फोटो हटवला नाही तर आम्ही भाजपवर मानहानीचा दावा दाखल करू, असे म्हटले आहे.