नापिकीला कंटाळून नांदेडमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिमायतनगर

तालुक्यातील सरसम येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. सरसम येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी चांदु किशन गुंडेकर (40, रा.सरसम) यांनी सततच्या नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून गुरुवारी रात्री दुसऱ्याच्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे कोरडवाहु चार एकर खरबाडी जमिन असून सतत तीन वर्षापासून पाऊस अल्प प्रमाणात पडत असल्याने शेतात काही पिकले नाही. बँकेचे व खाजगी कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते होते. हाताला मजुरीचे काम नाही, कुटुंबाचा गाडा कसा हाकलायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांच्या नावावर भारतीय स्टेट बँकेचे 58 हजाराचे कर्ज व इतर खाजगी कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई असा परिवार असून त्यांचा उदरनिर्वाह शेती व मजुरीवर चालत होता. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसात शेतकरी आत्महत्या अशी नोंद करून पंचनामा करण्यात आला आहे.