
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
शिवसेना आणि आमदार मनोहर भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच पनवेल व उरण तालुक्यातील साडेतीन हजार एकर भातशेती वाचली आहे. त्याबद्दल वशेणी, केळवणे आणि पुनाडे गावातील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे आणि मनोहर भोईर यांचे आभार मानले आहेत. या शेतकऱ्यांतर्फे रविवार 21 जुलै रोजी आमदार मनोहर भोईर यांचा याबद्दल भव्य सत्कार केला.
केळवणे गावाजवळील खारबंधिस्ती फुटल्यामुळे उरण-पनवेल तालुक्यातील वशेणी, पुनाडे, केळवणे या भागातील साडेतीन हजार एकर जमिनीत खारे पाणी शिरून ही शेत जमिन नापिक झाली होती. जवळ जवळ 100 मीटर पर्यंत मोठी खांड असल्यामुळे आणि येथे ट्रक तसेच मशिनरी नेण्यात अडचणीचे असल्यामुळे ही खांड बुजविण्यात अडचणी येत होत्या. आमदार मनोहर भोईर यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या मदतीने ही खांड तात्पुरती बुजविली होती. हजारो एकर भात शेतीत पाणी शिरल्यामुळे ती शेतजमिन म्हणजे एक समुद्रच झाला होता. गेले चार वर्षापासून आमदार मनोहर भोईर यांनी प्रत्येक अधिवेशनात या बाबत आवाज उठविला होता. दिवाकर रावते यांनी खारभूमी विकास मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खारभूमीच्या अधिकाऱ्यांना तातडीने या बाबत उपाय योजना करण्यास सांगितले. त्यानंतर जलसंपदा विभाग, खारभूमी आणि आमदार मनोहर भोईर यांच्या संयुक्त सहकार्यातून हे काम पुर्ण करण्यात आले. या कामासाठी मनोहर भोईर यांनी दीड महिना आपली पोकलन मशिन आणि डंपर मोफत दिले व सतत जातीने या कामावर लक्ष ठेवले होते.
आमदार मनोहर भोईर, मंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी प्रयत्न केल्यामुळे या भागातील हजारो एकर शेती वाचली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार मनोहर भोईर यांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला आमदार मनोहर भोईर, उरणचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेलचे तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, केळवणेच्या सरपंच अश्विनी घरत, विभागप्रमुख डॉ भरत घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

































































