
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
भरधाव दुचाकी-अॅपेच्या धडकेत पिता-पुत्र ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बुलढाणा ते चिखली मार्गावर केळवद गावानजीक घडली. प्रभाकर मुरलीधर वायाळकर (55) असे वडिलांचे तर गोपाल प्रभाकर (23) असे मुलाचे नाव आहे.
शिरपूर येथील रहिवासी प्रभाकर वायाळकरयांचे शिरपूर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते आपला मुलगा गोपाल याच्यासोबत दुचाकी (क्र.एम.एच.28 एआर 8639) ने केळवद येथील बँकेत काम आटोपून बुलढाणाकडे येत होते. चिखलीकडून बुलढाणाकडे येत असलेल्या अॅपेसोबत (क्र.एम.एच. 28 आर 2335) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात गोपाल प्रभाकर वायाळकर हा जागीच गतप्राण झाला तर प्रभाकर मुरलीधर वायाळकर यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा अपघात एवढा भीषण होता की अॅपे व दुचाकीचा चेंदामेंदा झाला. अॅपेमध्ये 5 प्रवासी होते. त्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती असून अॅपेचालक घटनास्थळावरुन फरार झाल्याचे कळते.
दरम्यान, उपशिक्षणाधिकारी एस.एस. काळूसे हे आपल्या वेगन आर कारने देऊळगावराजाकडून बुलढाणाकडे येत असताना त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून अपघातग्रस्तांना आपल्या कारमधून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.




























































