तितली वादळात मृत पावलेल्या बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बापाने नेला खांद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ओडिशामध्ये आलेल्या तितली वादळामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहाणी आणि वित्तहानी झाली. या दरम्यान स्थानिक प्रशासनाने बचावकार्यही राबवले होते, परंतु वादळानंतर प्रशासनाने नागरिकांना वार्‍यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. ओडिशामधील गजपतीभागात एका बालिकेचा या वादळात मृत्यू झाला. मुलीच्या शवविच्छेदनासाठे गाडी नसल्याने बापाने आपल्या मुलीचा मृतदेह आठ कि.मी चालत रुग्णालयात नेला.

मुकुंद डोरा असे या बापाचे नाव असून त्यांच्या आठ वर्षीय मुलगी चक्रवाती पुरात वाहोन गेली. 11 ऑक्टोबर पासून चक्रवाती सापडली नाही शेवटी तिचा मृतदेह एका नाल्यात सापडला. मुकुंद डोर यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी पंचनामा केला परंतु शवविच्छेदनासाठी कुठलीच मदत केली नाही.

शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णलायात नेणे गरजेचे होते. वाहतुकीची कुठलीच सोय नाही म्हणून मुकुंद यांनी आपल्या मुलीचा मृतदेह एका चादारीत गुंडाळून आठ कि.मी पायी प्रवास करून रुग्णालयात नेला. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आणि नुकसान भरपाई म्हणून मुकुंद डोरा यांनी 10 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सुपुर्द केला.

57 लोकांचा मृत्यू आणि केंद्राकडे मदतीची मागणी

तितली वादळामुळे ओडिशात आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 57 हजार 131 घरांचे नुकसान झाले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक हजार कोटींची मदत मागितली आहे.