
सामना ऑनलाईन । मुंबई
‘आयसीएसई’ बोर्डातून दहावीत प्रथम आलेला मुंबईतील आदित्य तुळशीराम अनंतराम (97.83 टक्के गुण) याच्यासह महाराष्ट्रातील सहा विद्यार्थ्यांना 2017 चा ‘डॉ. आंबेडकर गुणवत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन बुधवारी गौरविण्यात आले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातील भीम सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचा वितरण समारोह आज आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन गेहलोत यांनी यावेळी केले.
राज्यातील इतर पाच पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- नांदेडचा नूपुर गायकवाड (दहावी- 99 टक्के गुण), नांदेड जिल्हा हातगाव तालुक्यातील किरण रामकृष्ण इटूबोने (दहावी- 99 टक्के गुण), नागपूर जिल्ह्यातील तन्मय रमेश शेंडे (बारावी- विज्ञान 93.23 टक्के) गुण मिळवून अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम, जयश्री जानराव तायडे, बारावी वाणिज्य (93.69 टक्के गुण), लातूर जिल्ह्यातील रजनी गायकवाड बारावी कलाशाखा (93.38 टक्के गुण).



























































