
उदय जोशी, बीड
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या दराने महागाईचा भडका उडाला असल्याने सामान्य जनता हतबल झाली असताना आता खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्याच्या मालाचा उत्पादन किंमत ही वाढणार असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना यंदा सरकारच्या कृपेने खत उत्पादकांनी वाढवलेल्या खतांच्या किमतीचा फटका सहन करावा लागणार आहे.
उत्पादन किंमत अन बाजारभाव याची सांगड जुळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कितीही काबाडकष्ट केले तरी हातात मात्र काहीच राहत नसल्याने शेतकऱ्यांना दैनंदिन खर्चासाठी व्याजाने पैसे काढावे लागत आहेत. पिकावर एकरी झालेला खर्च अन पदरात पडलेल्या पिकाचा मोबदला नुकसानीत येत आहे. त्यात दरवर्षी घटत चाललेले शेतीचे उत्पादन या मुळेच शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. एकिकडे वाढणारा शेतीचा खर्च अन नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान शेतकाऱ्याना उद्ध्वस्त करत आहे. मोठ्या आशेने वर्षभर राबणारा शेतकरी वर्षाअखेर उपेक्षित जीवन जगत आहे. या दृष्टचक्राने जगाचा पोशिंदा कायम भुकेलाच राहत आहे. आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा अन कुटुंबाच्या भविष्याच्या काळजीने शेतकरी गळफास जवळ करत आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटना थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागात शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्त्या रोखण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरत आहे. राबवलेल्या उपाययोजना अपयशी ठरत आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना केवळ फार्स ठरत आहेत. शेतकरी कर्जबाजाराच्या चक्रव्यूहात अडकला असताना सरकारने यंदा खतांच्या किंमतीत वाढ केली आहे, खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे,
असे वाढले प्रत्येक बॅग खतांचे भाव – —
खते मागील भाव आताचे भाव
१५: १५:१५ ८८७ ९७५
१८:४६: ० १०७६ १२५८
२०:२०:०/१३ ८५० ९३०
१०:२६:२६ १०५५ ११३५
१२:३२:१६ १०६१ ११४५
२४:२४:० १०१५ १११०



























































