FIFA World Cup 2022 गोलपोस्टच्या पलीकडचे, अरब-अरब भाई-भाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रथमच अरब राष्ट्रांमध्ये फुटबॉल स्पर्धा रंगतेय. या स्पर्धेमुळे अरब राष्ट्रांमध्ये असलेले वादही काहीसे कमी झाले आहेत. एकीकडे यजमान कतारची कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब होत असल्यामुळे कतारी नागरिक निराश आहेत. मात्र त्यांना आपला देश हरल्याच्या दुःखापेक्षा सौदी अरेबिया आणि इराण जिंकत असल्याचा जास्त आनंद होतोय. त्यामुळे सारेच अरब देश एकमेकांना पाठिंबा देत असल्याचे सुखद दृश्य सध्या कतारमध्ये अनेक ठिकाणी दिसत आहेत. फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने का होईना हे अरब राष्ट्रांमधील कतार, सौदी अरब, यूएई, ओमान, इराण, इराक राष्ट्रांमधील हजारो फुटबॉल चाहते दोह्यात दाखल झाले असून सर्वच मुस्लिम राष्ट्रांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अमेरिकन आणि युरोपियन देशांचा अरब राष्ट्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असा विश्वास अरब राष्ट्रांच्या फुटबॉल चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

30 लाख तिकिटांची विक्री

फिफा वर्ल्ड कपची आतापर्यंत 30 लाख तिकिटे विकली गेल्याची माहिती फिफाने कळवली आहे. ही तिकीट विक्री रशियाच्या (24 लाख) तिकिटांपेक्षा अधिक आहे. या तिकीट विक्रीतून आतापर्यंत फिफाला 61 हजार 252 कोटी रुपयांची (7.5 बिलियन) कमाई झाली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 29 दिवसांमध्ये 64 सामने खेळविली जाणार आहेत. तिकीट विक्रीला लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ऑनलाइन काढलेली तिकिटे घेण्यासाठी प्रेक्षकांना दोहाच्या तिकीट काऊंटरवर फार मोठी रांग दिसत आहे. या तिकीट विक्रीला यजमान कतारसह सौदी अरेबिया, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, फ्रान्स, यूएई आणि हिंदुस्थानमधून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे फिफाने सांगितले.