
फिफा वर्ल्ड कपमध्ये उद्यापासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार बघायला मिळणार आहे. बलाढय़ ब्राझील आणि तुल्यबळ क्रोएशिया यांच्यातील लढतीने उपांत्य फेरीचा प्रारंभ होणार आहे. उभय संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित असून, या घडीला तरी ब्राझीलचेच पारडे जड वाटत आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अनेक दिग्गज संघांना अनपेक्षित पराभवाचा धक्का बसलेला आपण बघितला आहे. त्यामुळे जेतेपदाचा प्रबळ दावेदार ब्राझील आणि गतउपविजेता क्रोएशिया यांच्यातील लढतीकडे तमाम फुटबॉलप्रेमींच्या नजरा असतील यात वादच नाही.
या खेळाडूंवर असणार मदार
मार्सेलो ब्रोजोविच हा क्रोएशियासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. या मध्यरक्षकामध्ये मैदानाचा प्रत्येक कोपरा कव्हर करण्याची क्षमता आहे. गोल करण्यासाठी संधी निर्माण करण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कोवासिच व लुका मॉड्रिच अशा दिग्गज खेळाडूंसोबत खेळतानाचा फायदाही ब्रोजोविचला होतो. कारण हे दोघे मिडफिल्डर चेंडूवर ताबा ठेवण्यात पटाईत आहेत. त्यामुळे या त्रिमूर्तींपासून ब्राझीलला कधीही धोका होऊ शकतो एवढे नक्की! ब्राझीलबाबत बोलायचे झाल्यास नेमयारकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. मात्र, तरीही रिचार्लीसन हा या संघात सर्वात महत्त्वाचा खेळाडू होय. कारण त्याचा फिनिशिंग टच अफलातून असून, त्याने अनेकदा ते दाखवूनही दिले आहे. क्रोएशियाचे मध्यरक्षक नेमयारच्या हालचालीवर लक्ष ठेवतील, त्यावेळी रिचार्लीसनला क्रोएशियाच्या गोलपोस्टवर हल्ले करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ब्राझील-क्रोएशिया लढतीत कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता आता टिपेला पोहोचली आहे.
वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा भिडणार
ब्राझील आणि क्रोएशिया हे संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये तिसऱयांदा एकमेकांना भिडणार आहेत. याआधी, उभय संघांचा दोन वेळा आमना-सामना झालेला असला, तरी नॉकआउट लढतीत त्यांची प्रथमच गाठ पडणार आहे. ब्राझीलने 2006च्या वर्ल्ड कपमध्ये 1-0, तर 2014च्या वर्ल्ड कपमध्ये 3-1 असा विजय मिळविला होता. मात्र, यंदाच्या स्पर्धेत गतउपविजेत्या क्रोएशियाकडून ब्राझीलला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
अर्जेंटिनाचे आक्रमण विरुद्ध नेदरलॅण्डस्चा बचाव
दोहा : अर्जेंटिना व नेदलॅण्ड्स या संघांत शनिवारी मध्यरात्री दुसरी उपांत्यपूर्व लढत रंगणार आहे. जगातील अव्वल स्ट्रायकर लियोनल मेस्सीचा अर्जेंटिना संघ कुठल्याची प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात आक्रमण करण्याची क्षमता बाळगून आहे. याउलट कुठल्याही बलाढय़ संघाचे आक्रमण थोपविणारी बचाव फळी नेदरलॅण्ड्सकडे आहे. त्यामुळे हे दोन संघ उद्या एकमेकांवर कशी कुरघोडी करतात हे बघावे लागेल. मात्र, अर्जेंटिनाकडे मेस्सीसह इतरही एकास चढ एक खेळाडू आहेत. 2014 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलॅण्ड्सने मेस्सीला रोखण्यात यश मिळविले होते. मात्र, अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला होता. मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकतो. त्यामुळे फुटबॉलविश्वातील बहुतांश किताब जिंकलेल्या मेस्सीच्या झोळीत अद्याप जगज्जेतेपद आलेले नाही. त्यामुळे मेस्सीची ही राहिलेली उणीव भरून काढण्यासाठी अर्जेंटिनाचे सर्वच खेळाडू आता उर्वरित लढतींमध्ये सावध खेळ करतील. वर्ल्ड कपच्या सलामीच्या लढतीत सौदी अरेबियासारख्या दुबळय़ा संघाकडून पराभूत झाल्याने नेदरलॅण्ड्सनेही या बलाढय़ संघाला हरविण्याचे स्वप्न बघितले असेल.
गोलपोस्टच्या पलीकडचे एन्रिक यांनी पद सोडले
दोहा : वर्ल्ड कपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभवाचा धक्का बसल्याने स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 52 वर्षीय एन्रिक यांनी 2018 नंतर स्पेनचे प्रशिक्षक पद स्वीकारले होते आणि 2020 च्या युरो कपमध्ये आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविले होते. त्यांनी पद सोडल्यानंतर स्पॅनिश फुटबॉल महासंघाने आपल्या 21 वर्षाखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक लुईस दे ला फुएन्ते यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.
रोनाल्डोने धमकी दिली नव्हती
दोहा : स्वित्झर्लंडविरूद्धच्या सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान नसल्याचे कळताच रोनाल्डोने वर्ल्डकप सोडण्याची धमकी दिली होती, या वृत्ताचा पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने (एफपीएफ) इन्कार केला आहे. पोर्तुगालमधील एका दैनिकाने आपल्या वृत्तात 37 वर्षीय फॉरवर्डने संघात स्थान न मिळाल्यामुळे संघ सोडण्याची धमकी दिली होती. या वृताने फुटबॉल जगतात खळबळ माजली. हे वृत्त निराधार असल्याचे सांगून स्वित्झर्लंडच्या सामन्यापूर्वी रोनाल्डोने असे कोणतेही विधान केले नव्हते आणि संघ सोडण्याची धमकी दिली नसल्याचे एफपीएफने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
आजच्या उपांत्यपूर्व लढती
ब्राझील-क्रोएशिया : रात्री – 8ः30 वाजता
अर्जेंटिना-नेदरलॅण्ड्स : मध्यरात्री 12ः30 वाजता

























































