
सामना ऑनलाईन । मुंबई
फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्री म्हणून 28 वेळा सियाचीन-ग्लेशियरचा दौरा केला. हा त्या वेळचा एक विक्रमच होता. 1998 ते 2004 असे सहा वर्षे ते संरक्षणमंत्री होते. त्यांच्याच काळात पोखरणमध्ये अणुचाचणी झाली आणि जगाच्या नकाशावर हिंदुस्थानचे नाव सुवर्णाक्षरांत कोरले गेले.
एक तरुण मुंबईत येतो आणि कामगारांचा श्वास होऊन जातो. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रदीर्घ लढा उभारणारा हा तरुण पुढे देशाच्या राजकारणातही एक वादळ निर्माण करतो आणि दिल्लीचे तख्त हादरवून टाकतो. अशा अनेक नाटय़मय प्रसंगांनी ओतप्रोत भरलेल्या एका राजकीय पर्वाची आज अखेर झाली. बेस्ट संघटना, रेल्वे आणि टॅक्सी संघटनांनी त्यांच्या बंदच्या हाकेला आपलेसे केले. देशाच्या राजकारणात उद्योग मंत्री, रेल्वे मंत्री आणि संरक्षण मंत्री पदाची धुरा सांभाळत त्यांनी धडाडीचे निर्णय घेत आपला कणखर बाणा साऱया जगाला दाखवून दिला. असे हे लढाऊ नेतृत्व माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
निर्भिड
आणीबाणीच्या काळात ते वेगळी वेशभूषा करून सगळीकडे फिरायचे. अटकेपासून वाचण्यासाठी ते स्वतःची ओळख लेखक खुशवंत सिंह म्हणून करून द्यायचे. 2003मध्ये विरोधी पक्षाने कॅगचा हवाला देऊन फर्नांडिस यांच्यावर ताबूत घोटाळ्याचा आरोप केला. पण ते डगमगले नाहीत. उलट निधडय़ा छातीने या आरोपांना उत्तरे दिली. विरोधी पक्षाने उद्या पुरावे आणून द्यावेत, मी लगेच राजीनामा देतो, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. ऑक्टोबर 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फर्नांडिस यांना कारगील ताबूत घोटाळ्याप्रकरणी निर्दोष ठरवले.
आणीबाणीच्या काळात फर्नांडिस यांना बडोदा डाइनामाइट प्रकरणात अटक करण्यात आले होते. तुरुंगात ते कैद्यांना श्रीमद्भगवतगीता वाचून दाखवायचे.
आणीबाणी उठल्यानंतर फर्नांडिस यांनी तुरुंगात असतानाच बिहारच्या मुझफ्फरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी निवडून आले. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीत फूट पडल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पार्टीची स्थापना केली. राजकारण करत असतानाही त्यांनी कामगारांसाठी अखंड लढा दिला. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये फर्नांडिस यांच्या समता पक्षाचा समावेश होता. फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्री असताना जवानांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.
जायंट किलर
1950 ते 60 याकाळात जॉर्ज यांनी कामगारांसाठी लढा उभारला. लहान उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील कामगारांच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरले. धडाडीचा कामगारनेता अशी प्रतिमा निर्माण झाली. 1961 ते 1968 पर्यंत ते मुंबई महापालिकेत संयुक्त समाजवादी पक्षाचे नगरसेवक होते. 1967 हे वर्ष जॉर्ज यांच्यासाठी ऐतिहासिक ठरले. मुंबई काँग्रेसचे वजनदार नेते स. का. पाटील यांचा त्यांनी दारूण पराभव केला. देशभरात जायंट किलर अशी प्रतिमा निर्माण झाली.
आयुष्याला कलाटणी
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे कॅथॉलिक ख्रिश्चन कुटुंबात झाला. सहा भावंडात थोरले असलेले जॉर्ज लहानपणापासून चळवळ्या स्वभावाचे होते. त्यावेळच्या प्रथेनुसार जॉर्ज यांना मिशनरी शाळेत पाठविले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धर्मगुरू बनण्याची दिक्षा देण्याची प्रथा होती. मात्र, 19 व्या वर्षी 1949 ला जॉर्ज मुंबईत आले आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
फुटपाथवर रात्री घालवल्या
नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या जॉर्ज यांचे सुरुवातीचे दिवस हालाखीचे होते. चौपाटी आणि फुटपाथवर उपाशी झोपावे लागले. काही महिन्यांनी एका वृत्तपत्रात त्यांना मुद्रीत शोधकाची नोकरी मिळाली. याच काळात मुंबईतील कामगार नेते डीमॅलो यांच्या संपर्कात आले. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आयुष्यभर राहिला.
पत्रकार, लेखक
विद्यार्थीदशेत जॉर्ज यांनी पत्रकारिता सुरु केली. 1949 ला मातृभाषा कोकणीतील ‘कोकणीयुवा’ यात ते संपादक होते. समाजवादी चळवळ, लोकशाही, हिंदुस्थानी राजकारण यावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक साप्ताहिकांमध्ये त्यांनी लिखाण केले.


























































