पर्यटकांच्या भेटीमुळे फिल्मसिटी मालामाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मायानगरी मुंबईतील चित्रपटसृष्टीचे आणि ग्लॅमरचे अनेकांना आकर्षण असते. सिनेमा आणि मालिकांचे शूटिंग याचि देही, याचि डोळा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळावी आणि त्याद्वारे उत्पन्न वाढावे यासाठी बॉलीवूड टुरिझमचा अनोखा उपक्रम गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटीत) सुरू केला होता. या उपक्रमाला देशविदेशातील पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून गेल्या पाच वर्षांत 7.55 कोटींचा नफा फिल्मसिटीला झाला आहे.

बॉलीवूड टुरिझम योजना सुरू झाल्यापासून एप्रिल 2014 ते मे 2019 या कालावधीत तब्बल 2.93 लाख देशविदेशी पर्यटकांनी फिल्मसिटीला भेट दिली असून त्यातून 7.55 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाने दिली आहे. तसेच पाच वर्षांत दंडाद्वारे 9.29 लाख रुपयांची वसुली झाली आहे. फिल्मसिटी पाहण्यासाठी देशी पर्यटकांकडून 600 रुपये, परदेशी पर्यटकाकडून तीन हजार रुपये, विद्यार्थ्यांकडून 350 रुपये आकारले जातात. साधारण दोन हजार प्रेक्षक दरमहा फिल्मसिटीला भेट देतात.

गोरेगावची फिल्मसिटी ही 520 एकर जागेवर वसलेली असून यात अप्पू पप्पू मैदान, वेलकम मैदान, खंडाळा घाट, हेलिपॅड असे तब्बल 42 आऊटडोअर लोकेशन्स आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळ फिल्मसिटीचे काम पाहते.