
अधिक नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष वर्मा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे ते 22 जुलै 2024 या कालावधीदरम्यान आरोपीने फिर्यादीला पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादी सोम्या कांती नियोगी आणि आरोपी हर्ष वर्मा एकमेकांना ओळखत होते. हर्ष याने सोम्या यांना शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत असे सांगितले. तसेच शेअरमध्ये गुंतवणूक मिळवून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवले.
हर्ष याने सोम्या यांना मार्केट मास्टर हब जीओ-1 या व्हॉटॲप ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. ग्रुपचे ॲडमिन संशयित हर्ष वर्मा यांनी एका मोबाईल क्रमांकावर साईट तयार करुन त्यामध्ये फिर्यादी यांचे अकाऊंट तयार केले. यानंतर ही लिंक फिर्यादी यांना पाठवून पैसे गुंतवण्यास सांगून 21 लाख रुपयांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोम्या नियोगी यांनी जयगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलीस अमंलदार करत आहेत.