
40 लाखांचे थकीत बिल तसेच 11 लाख रुपये बँक गॅरण्टीची रक्कम परत देण्यासाठी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाकडे 20 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती यांच्याविरोधात ऍण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे.
मुजुमदार (नाव बदलेले) यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून या कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पातंर्गत विविध कामांचे कंत्राट मिळाले होते. ऑगस्ट 2020पर्यंत असलेल्या कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. नमूद कामाची अडीच कोटी बिलाची रक्कम तसेच 32 लाख बँक गॅरण्टी असे कंपनीला मिळणे प्रलंबित होते. पैसे मिळावे यासाठी मुजुमदार यांनी वारंवार प्रयत्न केल्यानंतर मार्च 2021मध्ये दोन कोटी 10 लाख बिलाची रक्कम तसेच जून महिन्यात 22 लाख बँक गॅरण्टीची रक्कम अदा करण्यात आली होती. तरीदेखील 40 लाखांची बिलाची रक्कम आणि 11 लाख बँक गॅरण्टीची रक्कम कंपनीला मिळणे बाकी आहे. या देयकाची फाइल मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. डी. एन. एल. मूर्ती यांनी स्वतःकडे अडकवून ठेवली. उर्वरित रक्कम पाहिजे असल्यास 20 लाख रुपये दे, अशी मागणी डॉ. मूर्ती यांनी मुजुमदार यांच्याकडे केली. पण लाच द्यायची नसल्याने मुजुमदार यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. दरम्यान, ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने केलेल्या चौकशीत डॉ. मूर्ती यांनी 20 लाखांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला.





























































