कसारा घाटात गॅस टँकरच्या केबिनला आग…मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कसारा

कसारा घाट चढत असताना उरण येथून नाशिककडे जाणाऱ्या गॅस टँकरच्या केबिनला टोपाची बावडी या पाँईटजवळ शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. आग लागल्याची घटना समजताच आपत्ती व्यवस्थापन टिमने त्वरीत धाव घेतली. अग्निशामक दलाने वेळीच दक्षता घेत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.

कडक ऊन असल्याने आग भडका घेत होती. यावेळी महामार्गावरील मदतीसाठी आलेल्या पोलीसांनी आपत्कालीन छोट्या अग्निरोधक बॉटलच्या सहाय्याने टँकरपर्यंत आग पसरू दिली नाही. नंतर अग्निशामक दल आल्यानंतर टँकरच्या कॅबिनची आग विझवण्यात आली.

शहापुरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी धावपळ करीत अग्निशामक दलास पाचारण केले. दुर्घटनाग्रस्त टँकर हटवेपर्यंत नाशिककडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दरम्यान, जर केबिनची आग पसरून टँकरने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता. गॅसने भरलेला टँकर असल्याने टँकरच्या स्फोटाने संपूर्ण हायवे उडाला असता. घटनास्थळापासून पाचशे फूट खाली रेल्वे ट्रॅक व २५हजार होल्टेजची ओव्हर हेड वायर होती. रेल्वे व महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते.

मदतीसाठी धावले
दरम्यान घटनास्थळी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टिमचे शाम धुमाळ, महेंद्र माने. दत्ता वातडे, पिक इन्फ्राचे अनिल ठाकुर व सहकारी, कसारा पोलीस ठाण्याचे पीएसआय सागर डगळे, ए.एस.आय. कोथे, बिंन्नर, तिडके, महामार्गावरील घोटी टँप पोलीस ए.एस.आय.हिरे, ए.एस.आय.गुजरे, हवालदार पाटील, हवालदार लगड व अग्निशामक दलाचे कर्मचारी धावले.