
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालुक्यातील हारेगाव येथे शनिवारी सकाळी अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने किराणा दुकानाला आग लागली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून 3 लाख रुपयांच्या किराणा साहित्याची राखरांगोळी झाली आहे.
औसा तालुक्यातील हरेगाव येथे नामदेव कोहाळे यांचे किराणा दुकान आहे. शनिवारी सकाळी 8 च्या दरम्यान उच्च दाबाने वीजपुरवठा झाला आणि यामध्ये त्यांच्या किराणा दुकानाला आग लागली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. गावचे तलाठी फडणवीस, ग्रामसेवक राजेगावे व सरपंच अरविंद कोहाळे यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. महावितरणने नुकसानभरपाई देण्याची मागणी नामदेव कोहाळे यांनी केली आहे.






























































