
भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला मध्यरात्री अज्ञाताने आग लावली. यामध्ये 15 ट्रक कांदा जळून खाक झाला. पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील घटनेने खळबळ उडाली आहे.देवीदास देवराम दरेकर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
देवीदास दरेकर यांचे साडू शनिवारी मध्यरात्री शेतीला पाणी देत होते. यावेळी दुरून त्यांना शेतात काहीतरी जळत असल्याचे दिसले. त्यांनी तिकडे धाव घेतली असता कांदा चाळीला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दरेकर यांना माहिती दिली. दरेकर आणि आजूबाजूच्या शेतकऱयांनी धाव घेऊन पाणी टाकून आग विझविली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण चाळ जळून खाक झाली होती.
आज सकाळी याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस मोढवे आणि झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय कोल्हे, खंडू खांडेकर, संतोष वाघुले, सूर्यभान दरेकर, श्रीकांत माळी, प्रकाश म्हस्के, पोलीस पाटील रामदास भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आधीच बाजारभाव नाही, त्यात संकट!
सध्या कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत माथेफिरूने कांदा चाळ पेटवून दिल्यामुळे दरेकर यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पारनेर पोलिसांनी तपास करून माथेफिरूला अटक करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी केली आहे.
























































