
माझी वसुंधरा अभियानातंर्गत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी नगरपालिकेमध्ये विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवकांनी एकमताने हा विषय तहकूब ठेवला आहे. त्यामुळे कोपरगावात फटाके विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही फटाक्यांवर संक्रांत आली आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ फटाके विक्रीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राज्यातही पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.त्यात कोपरगाव नगरपालिकेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत फटाके वापर व विक्रीवर बंदी घालण्याबाबत गुरूवारी सकाळी ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा विषय तहकूब ठेवला आहे.
आधीच कोरोनामुळे लहान-मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहे. त्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या विक्रीवर बंदीचे गडांतर येणार म्हणून फटाके विक्रेते हवालदिल झाले होते. मात्र सर्व नगरसेवकांनी एकमताने हा विषय तहकूब ठेवल्यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे. फटाके विक्रीस परवानगी मिळावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. जर फटाके फोडण्यावर बंदी घालायची आहे, तर फटाके बनवून विक्री करणार्यांना लायसन्स का देण्यात येते, असा सवाल फटाके विक्रेत्यांनी केला आहे.
परदेशी फटाक्यांवर बंदी
देशात परदेशी फटाकेविक्री, तसेच साठवणूक करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही दरवर्षी दिवाळीच्या काळात चिनी बनावटीचे फटाके बाजारात विक्रीसाठी येतात.त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.




























































