वाईत साळिंदराचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या पाचजणांना अटक; एकजण फरार, वन विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साळिंदराचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या वाई तालुक्यातील ओझर्डे येथील सहाजणांवर वाई वनपरिक्षेत्र विभागाने वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. एकजण फरार झाला आहे.

भरत सुरेश जाधव (वय 32), महेश अशोक साळुंखे (वय 28), गणेश अर्जुन कारंडे (वय 30), सोमनाथ काळू पवार (वय 47), नितीन अरुण गायकवाड (वय 26) अशी अटक केलेल्यांची नावे असून, मनोज नारायण घोरपडे (वय 39, सर्व रा. ओझर्डे) हा फरार आहे.

वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱयांनी मिळालेल्या माहितीनुसार ओझर्डे ते सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावरील शेतवस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. त्यावेळी भरत जाधव, महेश साळुंखे, गणेश कारंडे, सोमनाथ पवार, नितीन गायकवाड व मनोज घोरपडे हे साळिंदर या वन्य प्राण्याचे मांस पातेल्यात शिजवून पार्टी करीत असल्याचे आढळून आले. पंचनामा करून मुद्देमाल जप्त करीत असताना मनोज घोरपडे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. उर्वरित पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साळिंदर वन्यप्राण्याचे मांस हे कणूर येथील दीपक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आणून दिल्याचे कबूल केले.

या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने वनगुन्हा नोंद केला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर, भुईंजचे वनपाल संग्राम मोरे, वाईचे वनपाल सुरेश पटकारे, वैभव शिंदे, संदीप पवार, रामेश्वर भोपळे यांनी केली.