नागपूर – 5 वर्षीय चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या, हत्येपूर्वी अत्याचाराचा संशय

517

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीची गावालगतच्या शेतात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ती पाच दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचीही माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशी हादरली आहे.

शांताराम भलावी (रा.गांगतवाडा,ता. सौंसर, जि़छिंदवाडा, ह़मु़लिंगा, ता़ कळमेश्वर) हे मोलमजुरीसाठी मागील पाच वर्षांपासून लिंगा या गावात वास्तव्याला आहे. तर मृतक ही स्थानिक जिल्हा परिषद शाळा बालवाडीत शिकत होती. 6 डिसेंबरला मृतक ही गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे जाते म्हणून घरून निघाली. मात्र, ती परत आली नाही. तिचा सर्वत्र शोधाशोध केला असता कुठेही आढळून आली नाही. याविषयीची तक्रार पोलीस स्टेशन कळमेश्‍वर येथे करण्यात आली.

पोलिसांनी तत्काळ मुलीचा गावालगतच्या शेतशिवारात शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी सकाळी स्थानिक पोलीस, पोलीसपाटील शंकर झाडे व गावकऱ्यांना चिमुकलीचा मृतदेह संशयास्पदस्थितीत संजय भारती यांच्या शेतात आढळला. घटनेची माहिती कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, श्वानपथक, फिंगरप्रिंट अधिकारी यांना मिळताच सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवित शेतात काम करणाऱ्या सालदारावर संजय देवराव पुरी याला म्हणून अटक केली. त्याने स्वत: हत्या केल्याची कबुली दिली असून मुलीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या