
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पाहुणे म्हणून आलेल्या मुक्या पक्ष्यांना बंदुकीने ठार मारले जात आहे. मालाडच्या कांदळवनात आश्रय घेतलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या शिकाऱयांना कॅमेऱयात कैद केले असून ‘पॉज’ या पशूप्रेमी संघटनेने यासंदर्भात पोलीस आणि वनखात्याकडे तक्रार करून या शिकाऱयांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मालाड पश्चिमेच्या जनकल्याण नगरातील कांदळवनात परदेशी फ्लेमिंगो पक्षी आश्रयासाठी आले आहेत. जनकल्याण नगराजवळील मालवणी गावातील ९० फूट रोडवर खाडीकिनारी मरीना कंपाऊंड आहे. तेथील सोनाटा इमारतीजवळून आज दुपारी सवा वाजताच्या सुमारास काही लोक हातात बंदूक घेऊन कांदळवनाच्या दिशेने जाताना स्थानिकांनी पाहिले. या लोकांनी नंतर कांदळवनात फ्लेमिंगोंची शिकार करून मृत फ्लेमिंगोंना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घेऊन गेले.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश शेडय़ुल ५ मध्ये होतो. त्यांच्या शिकारीला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे यासंदर्भात ‘पॉज’ संघटनेच्या निशा पुंजू यांनी पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह संबंधितांकडे तक्रार केली आहे.



























































