
सामना प्रतिनिधी, वसई
युरोप आणि दक्षिण आफ्रिका येथे आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्षांचे वसईत यावर्षी आगमन झाले आहे. गेल्या तीन वर्षात कमी प्रमाणात आलेले हे पक्षी यंदा मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यांच्यासबोत यंदा अनेक भारतीय स्थलांतरित पक्षांचेही आगमन झाले आहे. त्यामुळे वसईतील खाडीलगत सध्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे मनमोहून घेताना दिसतात.
जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे खाजण दलदलीच्या भागात विपुल प्रमाणात खाद्यसाठा उपलब्ध झाल्यामुळे बाहेरगावाहून आलेले हे स्थलांतरीत पक्षी याठिकाणी आले असून त्यांचा मुक्काम दोन -अडीच महिने असणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर वसई- नायगाव दरम्यान, उमेळा-पापडी रस्ता, गास-चुळणे रस्ता, गोगटे सॉल्ट येथील खारटण भागात पाण्याची पातळी वाढते. यात शेवाळे, पाणकिडे, छोटे मासे हे आवडेत खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दरवर्षी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येत असतात. आता त्यात चमचे करकोचे, उघड चोच करकोचे, राखी बगळे, जांभळे बगळे, ब्राम्हणी घारी, शेकाचे, किंगफिशर, शारटी, कुदळ्या, वारकरी बदक या हिंदुस्थानी स्थलांतरीत पक्ष्यांची भर पडली आहे.
पावसाळ्यात गुजरात मधुन जास्त प्रमाणात फ्लेमिंगो येत असावेत असा अंदाज नेचर अॅडव्हेंचर सोसायटी ऑफ ठाणेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले.खारटण भागात पाण्याची पातळी वाढल्यानंतरच स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होत असते.येत्या दहा-पंधरा दिवसात वसई -उमेळा रस्ता, गास-चुळणे सनसिटी रस्ता, गोगटे सॉल्ट आणि वसई-नायगाव दरम्यान खारटण भाग रंगीबेरंगी पक्ष्यांनी फुलून जाणार आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे पक्षी पुन्हा परततात. साधारण सप्टेंबर ते आॅक्टोबर दरम्यान पक्षी निघून जातात.
पक्ष्यांवर मानवी आक्रमण
वसईत हजारोंच्या संख्येने येत असलेले देशी-विदेशी पक्ष्यांना आता स्थानिक लोक लक्ष्य करू लागले आहेत. आदिवासी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी अन्न म्हणून या पक्ष्यांकडे पहावयास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षात अनेक पक्ष्यांची शिकार केली गेली आहे. तसेच मातीच्या भरावामुळे पक्ष्यांना असुरक्षित वाटून त्यांचे स्थलांतर बंद होण्याची भिती पक्षीमित्र सचिन मेन यांनी व्यक्त केली.
सहा इंच चोचीचे फ्लेमिंगो
वसईत सध्या फ्लेमिंगोसह अनेक देशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरु झाले आहे. चार फूट उंचीचे, गुलाबी रंगाचे, सहा इंच चोचीचे रुबाबदार फ्लेमिंगो हेच येथील मुख्य आकर्षण आहे. फ्लेमिंगो दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये आढळून येतात. कच्छ रण येथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गुजरातचा राज्य पक्षी म्हणून फ्लेमिंगोची ओळख बनली आहे.
फ्लेमिंगोला रोहीत किंवा हंस या नावानेही ओळखले जाते सद्या वसईत या पक्षांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असून वसईच्या मिठागरात फ्लेमिंगोची राखाड्ये रंगाची पिल्ले दिसून येत आहेत. हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे त्यांचे मनमोहक रूप व हालचाली टिपण्यासाठी पक्षी प्रेमी व अभ्यासकांनी सद्या गर्दी केलेली दिसत आहे. वसई सनसिटी, गोगटे सॉल्ट, उमेळमान, राजिवली, नायगांव याठिकाणी यंदा मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो आलेले पहायला मिळत आहेत.
































































