
सामना प्रतिनिधी । चिपळूण
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चिपळूणला चांगलेच झोडपले. या पावसाने चिपळुणात तब्बल आठवेला पूर भरला. तर गेली सलग तीन दिवस पूर भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्री हळूहळू पूर ओसरण्यास सुरुवात झाली. आता चिपळूण बाजारपेठेत पूर ओसरला असून चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी स्वच्छता मोहिमेच्या कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे वाशिष्ठी नदीची अजून धोक्याची पातळी कमी न झाल्याने बहादुरशेख पुलावरील वाहतूक अजून बंद आहे.
चिपळूणला गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे वाशिष्ठी व शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळुणात तब्बल आठवेळा पाणी भरले. यामध्ये बाजारपुलावरून पाणी गेल्याने ते पाणी हळूहळू नाईक कंपनी परिसर, भेंडीनाका, बॅ. नाथ चौक, रंगोबा साबळे, रॉड, जुना बस स्थानक, भाजी मंडई, तसेच चिंचनाका, अनंत आईस फेक्ट्री, भोगाळे, मध्यवर्ती बस स्थानक आदी परिसरात पाणी होते. यामुळे चिपळूनवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. खेर्डीतही तीच परिस्थिती होती. तर ग्रामीण भागात पडझडीच्या मोठया घटना घडल्या. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादूरशेख पूल आठ ते दहावेळा बंद करावा लागला. तर खेर्डी मार्गावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद होती. यामुळे वाहन चालक व प्रवाशांचे हाल झाले. सलग तीन दिवस चिपळूणला पूर भरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अजूनही बहादुरशेख पूल बंद असून तर दुसरीकडे चिपळूण व खेर्डी बाजारपेठेतील पूर ओसरला आहे. मात्र, बुधवारी सकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्याने काही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

























































