शिवसेनेचे मदत पथक उद्या रवाना होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुरामुळे या भागातील जनजीवन कोलमडून पडले आहे. या पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून रविवारी सकाळी शिवसेना भवन येथून पूरग्रस्त भागात शिवसेनेची मदत पथके रवाना होणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस औषध कंपन्यांचे प्रतिनिधी, मुंबईतील काही डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. पूरग्रस्त भागांत तातडीने मदतकार्य सुरू करण्यासाठी रविवारी सकाळी डॉक्टर व मदतनीस यांचे पथक तसेच वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सामग्री व मदत पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

राज्यातील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध बैठका  पार पडल्या. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते रामदास कदम, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर खासदार राहुल शेवाळे यांच्यासह मुंबईतील शिवसेना आमदार, विभागप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे मदत केंद्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे मदत केंद्र शिवसेना भवनात सुरू करण्यात आले आहे. तांदूळ, डाळी व कडधान्ये, तेल, कांदे- बटाटे, मीठ, मिनरल वॉटर, बिस्कीट, कपडे, सॅनेटरी नॅपकीन, ब्लँकेट, टॉवेल, ताट-वाटय़ा या स्वरूपात या केंद्रात मदत स्वीकारली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 1800228595 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 022-24398230 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.