
महाविकास आघाडीच्या महामोर्चात आडकाठी निर्माण करण्यासाठी मिंधे गट आणि भाजपच्या वतीने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरात पुकारलेल्या बंदचा आज फ्लॉप शो झाला. वारकऱयांच्या आडून करण्यात आलेल्या या बंदच्या स्टंटबाजीला नागरिकांनी जुमानले नाही. दुकाने, हॉटेल, मार्केट आणि कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहिल्यामुळे बंदचा प्रभाव कुठेही जाणवला नाही.
टीएमटी जबरदस्तीने बंद; 15 लाखांचा फटका
वारकऱयांना पुढे करून ठाण्यातील मिंधे गटाने जबरदस्तीने ठाणे बंद पुकारला, पण सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मिंधे गटातील स्थानिक नेत्यांनी टीएमटीच्या बसेस जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले. 324 पैकी एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱयांचे अतोनात हाल झाले. या बंदमुळे 15 लाखांचा फटका बसला.
सरकारमध्ये असताना बंद कसला करता?
महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी सरकारने परवानगी दिली असताना ठाण्यात मात्र मिंधे गटाने आज बंद पुकारला. तुम्ही सरकारमध्ये आहात ना… मग बंद कसला करता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. खरे तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच द्यायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.































































