डोळा मारणे, फ्लाइंग किस हा लैंगिक छळच, तरुणाला एक वर्षाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीला डोळा मारणे, फ्लाइंग किस करणे मुंबईतील एका 20 वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत ‘पोक्सो’ न्यायालयाने संबंधित तरुणाला दोषी ठरवून एक वर्षाचा तरुंगवास आणि 15 हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच एखाद्या मुलीच्या भावनांशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणारी 14 वर्षांची अल्पवयीन तरुणी 29 जानेवारी 2020 रोजी आपल्या बहिणीसोबत घराबाहेर पडली असतानाच त्यांचा शेजारी असलेल्या 20 वर्षीय तरुणाने संबंधित मुलीकडे पाहून डोळा मारला होता. तसेच फ्लाइंग किस करत अश्लील चाळे केले होते.

याबाबतची तक्रार मुलीने आपल्या आईकडे करताच त्यांनी खातरजमा करत लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस अॅक्ट) गुन्हा दाखल करत अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी मी वेगळ्या जातीचा असल्याने मुलीच्या आईने मुलीशी बोलण्यापासून रोखले होते. तसेच तिने आपल्याला खोटय़ा गुन्ह्यामध्ये अडकवू असे आव्हान दिले होते असा दावा संबंधित तरुणाने केला.

मात्र त्याचा आणि डोळा मारणे, फ्लाइंग किस करणे याच्याशी काहीही संबंध नाही असे सांगत न्यायालयाने मुलगी तिची आई आणि तपास अधिकारी या तिघांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरत तरुणाला लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवले असल्याचे सरकारी वकील गीता शर्मा यांनी सांगितले.

न्यायालय काय म्हणाले

डोळा मारणे, फ्लाइंग किस करणे हा लैंगिक इशारा आहे. त्यामुळे सदर अल्पवयीन तरुणीचा लैंगिक छळ झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुलीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषीला अडकवण्यासाठी साक्षीदार जाणीवपूर्वक खोटी साक्ष देतील किंवा त्यामागे त्यांचा तसा काही हेतू आहे असा कोणताही पुरावा दिसत नाही.