
सामना प्रतिनिधी, परळी वैजनाथ
परळी शहरातले गुन्हेगारीचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची रविवारी रात्री 1 च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. ही घटना शहरातल्या उड्डाणपुलाखाली घडली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसात परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा तिसरा मोठा गुन्हा आहे. परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांच्यावर रात्री डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाखाली रात्री अज्ञातांकडून हल्ला करत त्यांचा खून करण्यात आला. या हल्ल्यात गायकवाड जागीच ठार झाले. त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या अनेक खुणा असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृष्णा नगरमध्ये होळीच्या दिवशी युवकाला चाकूने भोसकले होते तर याच भागात एका युवकाकडून गावठी बनावटीचे पिस्तुल काडतुसासह जप्त करण्यात आले होते. हे सर्व पाहता एकंदरीतच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
























































