किल्ले विशाळगडावर पुन्हा अतिक्रमण! कोंबड्या कापण्यासाठी शेडचे बांधकाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच, पुन्हा एकदा गडावर अतिक्रमण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय गडावर दारूपार्ट्यांसह अवैध धंद्यांमुळे गडाचे पावित्र्य राखण्यात जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

विशाळगडावरील छत्रपती अहिल्याबाई यांच्या समाधीशेजारीच चक्क कोंबड्या कापण्यासाठी मोठे शेड तयार करण्यात येत आहे. हे अतिक्रमण कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे? तसेच पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या गडावर हे अतिक्रमण कोणाच्या परवानगीने होत आहे? दोषींवर कारवाई होणार का? असे सवाल संतप्त शिवप्रेमींकडून होत असून, यावरून लवकरच प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा हिंदुत्ववादी संघटनांकडून घेण्यात येत आहे.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडनंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही या अतिक्रमणांवरून प्रशासनाला इशारा दिला होता. यानंतर जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन येत्या महाशिवरात्रीपर्यंत गडावरील सर्व अतिक्रमण काढण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर काही अतिक्रमणे काढण्यावरून वाद निर्माण झाला होता, तर गेल्या दोन दिवसांपूर्वी या अतिक्रमणाच्या बैठकीसंदर्भात जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून परस्पर बैठक बोलावण्यात आल्यावर शिवप्रेमी तसेच युवराज संभाजीराजे यांच्याकडून या भागातील आमदार विनय कोरे यांच्यावर नापसंती व्यक्त करण्यात आली होती. याचवेळी गडावर चक्क दारूपार्टी आणि जुगार सुरू असल्याचा प्रकार सोशल मिडियातून समोर आला आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 16) छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशाळगडावर गेलेल्या शिवप्रेमींना छत्रपती अहिल्याबाई यांच्या समाधी परिसरातच कोंबडे व इतर जनावरे कापण्यासाठी नवीन शेड उभारण्यात येत असल्याचे दिसून आले. संबंधित कामगारांना विचारणा केली असता, हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

हा अनागोंदी कारभार थांबवा, अन्यथा शिवप्रेमींचा रोष उसळेल

एकीकडे जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपर्यंत काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, गडावर अजूनही अनागोंदी कारभारच दिसून येत आहे. हा गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असतानाही परवानगीविना कोणीही कुठेही गडावर अतिक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाचा कसलाच धाक नसल्याचे दिसून येत आहे. छत्रपती अहिल्याबाई यांच्या समाधी परिसरात होत असलेल्या या बेकायदेशीर अतिक्रमणासंदर्भात संबंधित अधिकारी यांना फोटो आणि व्हिडीओ पाठवून कल्पना दिली आहे. त्यानंतर तेथील तहसीलदारांकडून हे काम बंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे ‘शिवदुर्ग संवर्धन’ आंदोलनाचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.