
फी भरली नाही म्हणून शाळेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर थेट कारवाई करत त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पोलीस आणि शाळेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता नववी आणि पाचवीतील तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सोलापूर शहरातील हिंदुस्थानी कव्हनेंट चर्च हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ही घटना घडली.
हिंदुस्थानी कव्हनेंट चर्च हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात (एचसीसी) या इंग्रजी माध्यमात इयत्ता नववी आणि पाचवीमध्ये शिकत असलेल्या चार विद्यार्थ्यांची दुसऱया सत्राची फी भरण्यास पालकांना विलंब झाला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेने चाचणी परीक्षेस बसू न देता त्यांना वर्गाबाहेर काढले. या विद्यार्थ्यांनी ही घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी प्राचार्यांना जाब विचारला. तसेच राहिलेली फीसुद्धा भरली. मात्र, पालकांनी जाब विचारल्याचा राग शाळेने मनात धरला. शाळेने पोलिसांकडे तक्रार करून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास सांगितले.






























































