फ्रान्सची उपांत्य फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नोवगोरॉड

राफेल वरानने पूर्वार्धात हेडरवर केलेला अफलातून गोल… ऍण्टोइन ग्रिझमॅनच्या किकवर उरुग्वेचा गोलकिपर फर्नांडो मुसलेराने केलेली अक्षम्य चूक… याच जोरावर फ्रान्सने शुक्रवारी उरुग्वेला २-० अशा फरकाने हरवले आणि रशियात सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत अगदी आरामात प्रवेश केला. आता ब्राझील व बेल्जियम यांच्यामधील विजेत्यासोबत फ्रान्सची उपांत्य लढत रंगेल.

मागील लढतीत हीरो ठरलेल्या एडिनसन कवानीला दुखापतीमुळे या लढतीत उरुग्वेचे प्रतिनिधित्व करता आले नाही. तसेच सस्पेंड असलेल्या मटुडीऐवजी कोरेण्टीन तोलिसो याला फ्रान्स संघात स्थान देण्यात आले. पूर्वार्धात फ्रान्सकडून वारंवार उरुग्वेच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्यात येत होते, पण फिनिशिंग व्यवस्थित होत नसल्यामुळे गोलची बोहणी होत नव्हती. अखेर ४० व्या मिनिटाला ऍण्टोइन ग्रिझमॅनच्या किकवर राफेल वरानने हेडरवर अफलातून गोल केला आणि फ्रान्सने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली.

१०२ सामन्यांच्या अनुभवाची एसीतैसी

६१व्या मिनिटाला उरुग्वेचा पाय आणखीनच खोलात गेला. उरुग्वेसाठी १०२ सामना खेळणाऱ्या फर्नांडो मुसलेरा या अनुभवी गोलकीपरकडून घोडचूक घडली. ऍण्टोइन ग्रिझमॅनने मारलेल्या किकचा फुटबॉल अगदी आरामात तो अडवू शकला असता. पण तो हाताने टोलवण्याच्या नादात स्वतःच्याच गोलजाळय़ात अडकला आणि फ्रान्सचा दुसरा गोल झाला. त्यानंतर फ्रान्सने ही आघाडी कायम ठेवली आणि विजय साकारला.

यावर एक नजर
-वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होण्याची उरुग्वेची ही दुसरीच खेप. याआधी १९६६ साली त्यांना पश्चिम जर्मनीकडून हार पत्करावी लागली होती.

-जर्मनी, ब्राझील, इटलीनंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत सहाव्यांदा पोहोचणारा फ्रान्स चौथाच संघ ठरला आहे.

-२००६ सालानंतर फ्रान्सला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचता आले आहे.