गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण – मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक, महिला अधीक्षक अशा तिघांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही आश्रमशाळा कायमची बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

जपतलाई आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी पहाटे झोपेत असताना मण्यार जातीच्या अतिविषारी सापाने दंश केल्याने दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या अनुक्रमे सहावी, आठवी आणि दुसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला. घटनेच्या वेळी मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते, असे समोर आले. या प्रकरणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून आज पहाटे धानोरा पोलिसांनी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षक भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.