
गणपतीचे वाहन उंदीर असले तरी साखरपा येथील काही घरांमध्ये अश्वारूढ गणेशांची परंपरा आहे. गेली 150 वर्षांहून अधिक काळ ही घराणी ही परंपरा जपत आहेत. मराठीशाहीत विशाळगडावर अधिकारी असलेली ही घराणी गड उतरताना घोड्यावरून आली म्हणून त्यांचे गणपती अश्वारूढ आहेत.
साखरपा कोंडगाव परिसरात सरदेशपांडे, अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे, नवाथे, जोगळेकर, गद्रे, पोंक्षे ही घराणी पूर्वापार रहातात. यापैकी सरदेशपांडे घराण्याकडे विशाळगड सुभ्यातील गावांच्या महसुल वसुलीचे अधिकार होते तर अभ्यंकर हे पागा सांभाळत असत. केळकर हे दिवाण होते तर केतकर कुटुंबाकडे सुभेदारी होती. रेमणे हे ग्रामोपाध्ये होते. या घराण्यांना साखरपा आणि परिसरातील गावांमढे जमिनी इनाम मिळाल्या होत्या. मराठेशाहीचा अस्त झाला. इंग्रजांचे साम्राज्य वाडीस लागल्यावर या कुटुंबांचे अधिकार लोप पावले आणि चरितार्थासाठी ही कुटुंबे गडउतार झाली. गडावरून येताना ते घोड्यावरून आले म्हणून त्यांचे गणपती घोड्यांवरून आणण्याची प्रथा सुरू झाली.
सुरुवातीला या घराण्यांकडे लाकडी अश्व होते. त्या अश्वांच्या पाठीवर लोखंडी सळी असे. मूर्तिकार त्या सळीच्या आधाराने गणेशमूर्ती काढत असत. आजही सरदेशपांडे, केळकर, जोगळेकर, पोंक्षे यांच्याकडे हे लाकडी अश्व आहेत आणि त्यांच्या गणेशमूर्ती त्याच अश्वावर काढल्या जातात. हे अश्व नागपंचमीला मूर्तिकारांकडे पोचविण्याची प्रथा या घराण्यांमध्ये आहे.

रेमणे, नवाथे, अभ्यंकर यांचे अश्व आजही सुस्थितीत आहेत पण आता त्यांवर गणपती काढणे, अश्वारूढ गणेश मूर्तिकारांकडून आणणे, विसर्जन करणे हे कठीण होत चालल्याने त्यांनी मातीच्या अश्वासह मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे.
”लाकडी घोड्यावर गणपती काढणं, स्थापना करणं आणि विसर्जन करणं अडचणीचं असलं तरी पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा जपताना आनंद आहेच. आता काही घराण्यांचे लाकडी जीर्ण झाले असले तरी मातीच्या घोड्यावर तयार केलेले गणपती आणून ते परंपरा जपत आहेत. ”
- चैतन्य सरदेशपांडे
































































