पुण्यात गणेशोत्सवासाठी 627 अधिकारी, 3834 कर्मचारी ऑनड्युटी; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैभवशाली परंपरा असलेल्या गणशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून उत्सव निविघ्र्नपणे पार पाडण्यासाठी तब्बल 627 अधिकारी आणि 3 हजार 834 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय वाहतूक शाखा, बीडीडीएस पथक, क्यूआरटी टीम, गुन्हे शाखेतील साध्या वेशातील कर्मचारी अधिकारीही तैनात केले आहेत. उत्सवाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे, विशेष शाखा उपायुक्त आर. राजा उपस्थित होते.

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 3 हजार 566 आहे. तर घरगुती गणपतींची संख्या एकूण 4 लाख 54 हजार 686 एवढी आहे. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोरोना महामारीनंतर यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेच्या पथकांना ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हद्दीतील गणेशोत्सव मंडळांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार मंडळ पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 हजार 709 जणांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीस मित्र समित्यांची 69 बैठका घेण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवातील शहर पोलिसांचा बंदोबस्त

अपर आयुक्त-4, पोलीस उपायुक्त -10, सहायक पोलीस आयुक्त -26, पोलीस निरीक्षक- 85, एपीआय- 438, पोलीस अमंलदार-3584, होमगार्ड- 600 एसआरपीएफ- दोन तुकड्या, बाहेरून मागविण्यात आलेला बंदोबस्त-एसीपी-4, पोलीस निरीक्षक-10, एपीआय-50, अमलदार-250 आहेत. त्याशिवाय बीडीडीएस पथके, क्यूआरटी टीम, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांना नियुक्त करण्यात आले आहे.

विसर्जन देखाव्यासाठी उंचीची मर्यादा

विसर्जन मिरवणूकीचा मुख्य मार्ग असलेल्या छत्रपती संभाजी पूल, लकडी पूल मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची 21 फूट आहे. तर गरवारे मेट्रो स्टेशन ब्रीजची उंची 18 फूट, कर्वे रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दोन्ही बाजुस सर्व्हिस रोडची रुंदी 15 फूट आहे. पुणे मनपा मेट्रोपूल उंची 21 फूट असल्यामुळे मोठमोठ्या विसर्जन देखाव्यांमुळे मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. त्यामुळे मंडळांनी देखाव्यांची उंची 15 ते 18 फूट ठेवावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी केले. वनाज मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर 20 फूट, आनंदनगर गेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर 16.5 फूट, आयडीएल स्टेशन कॉन्क्चर पिलर 17 फूट, नळस्टॉप मेट्रो स्टेशन कर्वे रोड, पुणे 14 फूट, नळस्टॉप कर्वेरोड 14 फूट आहे.

पाच दिवस रात्री बारापर्यंत वाजवा रे वाजवा

सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत दिनांक 3 ते 4 सप्टेंबर, 6 ते 7 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर असे एकूण पाच दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा मंडळांनी वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याशिवाय 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबरला शहरासह जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्याभागात गणेशोत्सवाचे पाचव्या आणि सातव्या दिवशी विजर्सन केले जाते, त्याठिकाणी मद्यविक्रीला बंदी घातली आहे.

वाहतूकीसाठी विशेष उपाययोजना

मध्यवर्ती शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः दगडूशेठ हलवाई गणपती, मानाचे गणपती, ऐतिहासिक परंपरा असलेल्या मंडळाच्या ठिकाणी वाहतूकीचे बारीक नियोजन केले आहे. परिसरातील पार्किंगची व्यवस्था, नो पार्किंग झोन, नो व्हेईकल झोन, राखीव कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

”कोरोना महामारीनंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यापाश्र्वभूमीवर पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीन काळजी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. बाप्पाच्या आशीवार्दाने उत्सव निविघ्र्नपणे पार पडणार आहे. मध्यवर्ती वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, साध्या वेशातील अधिकारी कर्मचारी, विविध पथके नागरिकांसह पुणेकरांच्या दिमतीला रात्रंदिवस कार्यरत राहणार आहेत.”

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर