हुंड्यासाठी पतीनेच पत्नीवर करविला सामूहिक बलात्कार, गुप्तांगाला मिरची आणि बाम लावून बेशुद्ध केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हुंड्याच्या लोभापायी नवऱ्याने आपल्या नवविवाहित पत्नीवर तरुणांकडून सामूहिक बलात्कार करवून घेतल्याची घटना राजस्थानातील धौलपूर येथे उघडकीस आली आहे. पीडित नवविवाहितेने नवऱ्याच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यातील बसेडी गावात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचे लग्न 14 जानेवारी रोजी झाले. त्यानंतर माहेरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून सासरची मंडळी तिचा छळ करू लागली. दररोज हा छळण्याचा प्रकार वाढतच होता. 26 जूनला रात्री 12 वाजता या नवविवाहितेचा नवरा एका अनोळखी तरुणाला घेऊन घरी आला. या तरुणाने नवऱ्यासमोरच तिच्या तोंडात कापडाचा बोळा घुसवला आणि तिच्यावर बलात्कार केला.

एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशीही पीडितेचा नवरा काही तरुणांना घेऊन घरी आला. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच तिचे उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात राहणारे कुटुंबीय तिच्या सासरी पोहोचले आणि त्यांनी तिला सोबत घेऊन मंगळवारी सायंकाळी बसेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडित नवविवाहितेने नवऱ्याने सामूहिक बलात्काराच्या बदल्यात त्या तरुणांकडून पैसे घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तरुणांना विरोध केल्यामुळे नवऱ्याने गुप्तांगात मिरची आणि बाम लावून बेशुद्ध केले, असा आरोपही पीडितेने नवऱ्यावर केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा नवरा आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित नवविवाहितेची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.