डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचे ‘आरोग्य’ धोक्यात, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेचा बोजवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. आवारात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे तयार झाले असून नेहमीच प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. यातून वाट काढत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी येथे यावे लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या या रुग्णालयाचेच ‘आरोग्य’ धोक्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका सध्या सर्वत्र ‘स्वच्छ सुंदर व हरित शहर’ असा प्रचार करत आहे. स्वच्छतेचे सर्वेक्षणही सुरू आहे, पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शास्त्रीनगर रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. अनेक दिवस कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रशासन रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

हजेरी लावून कर्मचारी-डॉक्टर गायब
रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून पालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. संतापजनक म्हणजे सकाळी 9 वाजता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावणारे कर्मचारी-डॉक्टर काही वेळातच रुग्णालयातून खासगी कामासाठी तासन्तास गायब होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तळमजल्यावर असलेल्या शस्त्रक्रिया विभागाचे कामही अत्यंत संथगतीने सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.